Wednesday, July 13, 2022

प्रशांत गझल - नादात पावसाच्या !!

 


गागालगा लगागा गागालगा लगागा - आनंदकंद

नादात पावसाच्या !!

मनसोक्त आज भिजलो पाण्यात पावसाच्या
झिंगून नाचलो मी तालात पावसाच्या

विसरून मात्र गेलो माझ्या वयास पुरता
दंगून गात बसलो नादात पावसाच्या

पाऊस आज टप टप बरसून काय आला
गुंतून खास गेलो थेंबांत पावसाच्या

विज बघ नभात चमके गालात लाजताना
रंगून चिंब झालो छंदात पावसाच्या

थंडी तशीच भरली येता तूफान मोठे
थिंबून पूर्ण गेलो कहरात पावसाच्या

प्रशांत कदम,
मुंबई,
१३~०७~२०२२.

Sunday, July 10, 2022

प्रशांत गझल - करमत नसे कुणाला !!



गागालगा लगागा गागालगा लगागा - आनंदकंद 


करमत नसे कुणाला !!


खेळू नये मनाशी उमजत नसे कुणाला 

नाजूकसे ह्रदय का समजत नसे कुणाला 


जर मोडले कुणीही मन आपले कधीही 

आनंद हर्ष सुद्धा हसवत नसे कुणाला 


नाही उमेद जेथे काटेच पेरलेले

गंभीर गात्र असता बसवत नसे कुणाला


जागी अमंगलाच्या मंगल कसे घडावे 

शापित घरात कोणी जमवत नसे कुणाला 


साथी घरात नाही सोडून दूर गेला

विरहात आसवांच्या करमत नसे कुणाला


प्रशांत कदम, 

मुंबई, 

९५९४५७२५५५.

०९~०७~२०२२.

प्रशांत अभंग - पंढरीची वारी !!



पंढरीची वारी !!


पंढरीची वारी । मनात असावी ।

स्वप्नात दिसावी । सदोदित ।।१।।


आषाढीची वारी । पंढरीच्या दारी । 

पावसाच्या सरी । गगनात ।।२।।


साद मृदुंगाची । नाद चिपळ्यांचा।

गजर नामाचा । आसमंती ।।३।।


मिटे सर्व चिंता । दूर होती दुःखे ।

येती सर्व सुखे । नाम घेता ।।४।।


विठू रखुमाई । मायेची सावली ।

भक्तांची माऊली । खरोखरी ।।५।।


कशास करावी । चिंता जीवनाची ।

असे श्रीहरीची । कृपा सारी ।।६।।


विठू रखुमाई । प्रशांत जाणतो ।

आपले मानतो । मायबाप ।।७।।


प्रशांत कदम, 

गोरेगांव, मुंबई, 

9594572555.